नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत देशात १७ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. विनाकारण लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे.
कोरोना व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होते. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग हा एकमेव पर्याय सध्या कोरोनापासून सुरक्षित ठेऊ शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी एकमेकांपासून दूर राहणं पसंत केले आहे. आरोग्य कर्मचारी सुरक्षेची पुर्ण काळजी घेऊन रुग्णांवर उपचार करत आहेत. अशातच दिल्लीमधील धक्कादायक घटना समोर आली आहे.
मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, जो माझ्या जवळ येण्याची हिंमत करेल त्याच्यावर मी हात कापून रक्त उडवेन अशाप्रकारे एका माथेफिरुने धमकी दिल्याने सफदरजंग रुग्णालयात परिसरात खळबळ माजली. जवळपास दिडतास हा ड्रामा सुरु राहिला. हा माथेफिरू रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत उभा होता. अखेर अनेक तासांच्या या प्रकारानंतर दिल्ली अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला उतरवून पोलिसांच्या स्वाधीन केले.
अग्निशमन दलाचे अधिकारी अतुल गर्ग म्हणाले की, दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सफदरजंग रुग्णालयाच्या वार्ड नंबर २९ मधील तिसर्या मजल्यावरील टेरेसच्या बाल्कनीत एक व्यक्ती चढली आहे. बाल्कनीवर चढणारी व्यक्ती स्वत: ला कोरोना पॉझिटिव्ह म्हणत आहे. कोणीही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये असं ती माथेफिरु व्यक्ती म्हणत होती. त्याच्याजवळ येण्याचे धाडस करेल त्याच्यावर आपला हात कापून रक्त उडवेन अशी धमकी देत होता. आम्हाला माहिती मिळताच जेव्हा आमचे कर्मचारी त्याठिकाणी पोहचले तेव्हाही तो असाच प्रकार करत होता असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दिल्ली अग्निशमन दलाच्या जवानांना त्याला खाली उतरवण्यात यश आले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना तपासात आढळले की, ही व्यक्ती सुमारे ४४ वर्षांची आहे. तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. सफदरजंग रुग्णालयात तिसरा मजल्यावरील बाल्कनीत तो कसा पोहचला? कारण खासगी सुरक्षा कंपनीचे सुरक्षा कर्मचारी रुग्णालयात 24 तास तैनात असतात याबद्दल पोलीस माहिती घेत आहेत. हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या नाजूक आहे. मग असं असताना त्याला कोरोनाच्या धोक्याविषयी कसे माहिती असेल तसेच एखाद्यावर आपले रक्त शिडकावल्यास त्याच्या रक्ताच्या थेंबाने त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो याचा पोलीस तपास करणार आहे