नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) पाठोपाठ आता आयसीएसई बोर्डाने (ICSE Board) देखील मोठा निर्णय घेतला आहे. आयसीएसई बोर्डाने अखेर दहावीचीपरीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल असं ICSE बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचंं स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीएसईच्या 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. 4 मे ते 14 जून दरम्यान होऊ घातलेल्या 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 1 जून रोजी देशातील स्थितीचा आढावा घेऊन 12 वीच्या परीक्षांच्या तारखा निश्चित केल्या जातील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या 15 दिवस आधी त्याबाबत सूचित केले जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल म्हणाले की, यंदा सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना अकरावीत प्रमोट केले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन आणि प्रात्यक्षिकांचे गुण यांचा आधार घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याबाबत सीबीएसई वस्तुनिष्ठ निकष निश्चित करणार आहे.
'राज्यातील दहावीच्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार, लवकरच होईल निर्णय'
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन राज्यातील दहावी आणि बारावी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर, आता सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य मंडळाच्या दहावीच्या परिक्षाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याच शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
दहावीच्या परीक्षा जूनमध्ये, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत दिल्या. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शाळांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात आणि राज्य सरकारच्या नियमावलींचे पालन करण्याची विनंती केली होती. आता, सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य मंडळाच्या दहावीच्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाविषयी विचार व चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करणार, असेही शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.