नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्व लोक दहशतीखाली जीवन जगत आहेत. अशात व्हेंटिलेटरवर जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या रुग्णाची देखभाल करणारे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांना थोडीशी चूकही किती महागात पडू शकते याची जाणीव आहे. चीनमध्ये ३ हजार ३००, स्पेनमध्ये ५ हजार ६०० तर इटलीत ५ हजार आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
या तिन्ही देशांमध्ये २०० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्स, रुग्णवाहिका चालक यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. एका चॅनेलशी बोलताना न्यूयॉर्कमधील सर्जन डॉक्टर कॉर्नेलिया ग्रिग्ज म्हणाल्या, मी पहिल्यांदा कामावर जाण्यास घाबरत आहे, परंतु भीती असूनही लोकांचा जीव वाचवण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे आणि हेच आम्ही करतो आहेत. यापूर्वी, मी आणि माझे पती यांनी कधीच मृत्यूपत्र लिहायचा विचार करत नव्हतो, परंतु आवश्यक कामांच्या यादीत आम्ही त्याचा समावेश केला आहे.
भारतातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची अवस्था आणखी चिंताजनक आहे. देशातील बर्याच सरकारी रुग्णालयांमध्ये मास्क, शस्त्रक्रियेसाठी लागणारी संरक्षित साहित्य, आणि सॅनिटायझर्सची कमतरता आहे. बिहारच्या भागलपूरमध्ये असलेल्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये ५०० हून अधिक ज्येष्ठ आणि निवासी डॉक्टर आहेत. काही दिवसांपूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयातून पाठविलेल्या चार नमुन्यांमध्ये कोविड -१९ ची पुष्टी झाली होती. त्यामुळे आता या संपूर्ण रुग्णालयात अभूतपूर्व संकट उभं राहिलेलं दिसतं.
हळूहळू देशाच्या अन्य भागातूनही अशाप्रकारे बातमी येत आहे. समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगबाबत डॉक्टर सचिन वर्मा व्हिडीओ अपलोड करत आवाहन केलं की, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि वॉर्ड बॉय यांना मास्क आणि संरक्षित उपकरणाशिवाय काम करावं लागत आहे. एकादा वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली की भारताची आरोग्य सेवा यंत्रणा कोलमडून पडू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
घरातील लोकांसाठी स्वच्छतेसाठी सॅनिटायझरपेक्षा हात धुणे अधिक चांगले आहे. रुग्णालयात वारंवार हात धुता येत नसल्याने सॅनिटायझरचा वापर केला जातो. परंतु आता स्थिती अशी आहे रुग्णालयातही सॅनिटायझर संपत आहे. ते बाजारात उपलब्ध नाही असं नेहरू मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितले.
या सर्व कठीण परिस्थितीचा सामना करत डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लोकांनी घरातच राहावं, बाहेर पडू नये असं वारंवार आवाहन सरकार आणि डॉक्टर्सही करत आहेत. त्याचसोबत आवश्यक मेडिकल साहित्य घरात साठवून ठेवू नका असंही सांगितलं आहे अन्यथा आरोग्य कर्मचारी वाचले नाहीत तर तुम्ही कसे वाचणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.