नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी देशात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईची सद्यस्थिती मांडली. तसेच कोरोनाविरोधात लढताना घ्यावयाच्या खबरदारीविषयीही देशवासियांना सल्ला दिला.
देशवासियांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, आज आपल्या देशाचा रिकव्हरी रेट अन्य देशांच्या तुलनेत चांगला आहे. त्याबरोबरच आपल्या देशात कोरोनामुळे होणार मृत्यूदरसुद्धा अन्य देशांपेक्षा कमी आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र अनेकांना मास्क वापताना त्रास होतो. जर तुम्हाला मास्क परिधान करायला त्रास होऊ लागला, मास्क काढून ठेवावा असं वाटू लागलं तर एका क्षणासाठी त्या डॉक्टरांचं, नर्सचं स्मरण करा. आपल्या त्या कोरोनायोद्ध्यांची आठवण काढा जे दिवसभर मास्क वापरून अव्यहतपणे रुग्णसेवा करत आहेत.’’
एकीकडे आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई अधिक जागरुकतेने आणि सतर्कपणे लढण्याची गरज आहे. तर दुसरीकडे कठोर मेहनत करून व्यवसाय, नोकरी, शिक्षण, यामध्ये गती आणावी लागेल. त्याला एका विशिष्ट्य उंचीवर न्यावे लागेल, असा सल्लाही मोदींनी दिला.
दरम्यान, दरम्यान, आज मन की बात च्या ६७ व्या भागात देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील योद्ध्यांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये म्हणाले की, युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट प्रभाव पडत असतो. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आमचे वर्तन, आमचा व्यवहार, आमची वाणी, आमची विधाने, आमच्या मर्यादा आणि आमचे लक्ष्य या सर्वामध्ये आपण जे काही करत आहोत त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे. तसेच त्यांच्या सन्मान वाढला पाहिजे.
कधी कधी आम्ही एखादी गोष्ट समजून घेतल्याशिवाय सोशल मीडियावर अशा गोष्टी शेअर करतो ज्यामुळे आपल्या देशाचे खूप नुकसान होते. कधीकधी ही बाब चुकीची आहे हे माहिती असूनही केवळ कुतुहल म्हणून फॉरवर्ड केले जातात, अशी नाराजीही मोदींनी व्यक्त केली.