नवी दिल्ली: कोरोनानं सर्वत्र घातलेल्या थैमानामुळे दहशतीचं वातावरण आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय. मात्र काही ठिकाणी प्रशासनाच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. देशातले कोट्यवधी लोक दरदिवशी रेल्वेनं प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ केलीय. सध्या रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांना मिळतं. आता त्यात पाच पटींनी वाढ करण्यात आलीय. त्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागतील. देशातल्या २५० रेल्वे स्थानकांवर नवे दर लागू करण्यात आले आहेत. रेल्वेतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली. २५० रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० रुपये आकारले जातील. पश्चिम रेल्वेच्या मुंबई, बडोदा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर रेल्वे स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर ५० रुपये करण्यात आलाय. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी टाळण्याच्या हेतूनं प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्यात आल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. तिकीट दरात वाढ करण्यात आल्याची माहिती देताना अधिकाऱ्यानं मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाकडे लक्ष वेधलं. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तिकिटांच्या दरांमध्ये वाढ करण्याचा अधिकार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आल्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३० पेक्षा जास्त असून दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय. आज मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल अद्याप मिळाला नसल्याची माहिती आरोग्य मंत्री टोपेंनी दिली.
Coronavirus: गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; २५० स्थानकांवर होणार लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 5:45 PM
प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात रेल्वेकडून पाचपट वाढ; गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय
ठळक मुद्देप्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात रेल्वेकडून पाचपट वाढदेशातल्या २५० रेल्वे स्थानकांवर नवे दर लागू प्लॅटफॉर्म तिकीटासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागणार