नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक शाळांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्रातही दहावीच्या विद्यार्थ्यांचा राहिलेला शेवटचा पेपर रद्द करण्यात आला. मात्र सीबीएसई बोर्डाने परीक्षेबाबत कोणतीही सूचना न दिल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत होतं.
सोमवारी सीबीएसईने एक परिपत्रक काढत म्हटलं की, २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला आहे. सीबीएसईच्या ९ ते १२ वी च्या पेपरमध्ये २० टक्के ऑब्जेक्टिव प्रकारचे प्रश्न असतील. ज्यात मल्टिपल चॉईस प्रश्नांचा समावेश असेल. अशाप्रकारे २० टक्के आणि १० टक्के सॉर्स बेस्ड इंटीग्रेटेड प्रश्न विचारले जातील. सीबीएसईची ही नवीन पद्धत 9 वी ते 12 वी पर्यंतच्या परीक्षेसाठी लागू केली गेली आहे असं म्हटलं आहे.
२० टक्के वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांसाठी पेपर सोपा असू शकतो. यासंदर्भात परीक्षा मंडळाने शाळांनाही माहिती दिली आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, पॅटर्न बदलला आहे, परंतु परीक्षेचे गुण आणि ती पूर्ण करण्याची वेळ तेवढीच राहील असं सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या स्थगित परीक्षावर हा नियम लागू असणार नाही. देशात लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा परीक्षा होईल त्यावेळी जुन्या पॅटर्नच्या आधारावर प्रश्न विचारले जातील असं परिपत्रकात म्हटलं आहे.
लॉकडाऊनमुळे सीबीएसईच्या अनेक परीक्षा राहिल्या आहेत. १० वी आणि १२ वी साठी पहिलं ४१ विषयांसाठी परीक्षा घेतली जात होती. मात्र त्या कमी करुन फक्त २९ विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर परीक्षेबाबत आणि वेळापत्रक विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल. तथापि, यात अन्य काही बदल असल्यास सीबीएसईने विद्यार्थी, पालकांना त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती पुरविण्यात येईल असंही सांगितले आहे