जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. भारत देखील कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,247 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 521966 लोकांना जीव गमवावा लागला आहे. रविवारच्या तुलनेत कमी झालेल्या रुग्णांमुळे दिलासा मिळाला असला तरी दिल्लीतील आकडेवारीने आता पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. राजधानीत एका दिवसात कोविड-19 चे 501 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकूण नवीन प्रकरणांपैकी हे सुमारे 40 टक्के आहे.
दिल्लीतील रुग्णांच्या संख्येव्यतिरिक्त, दिल्लीतील संसर्ग दर देखील चिंतेचे कारण आहे. सोमवारी दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर 7.72 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रविवारी हा आकडा 4.21 टक्के होता. रविवारच्या तुलनेत सोमवारी राजधानीत 16 कमी प्रकरणे नोंदवली गेली असली तरी, नवीन रुग्णांच्या एकूण संख्येच्या बाबतीत ते सर्वाधिक आहे. दिल्लीत सध्या 211 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीनंतर हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोमवारी येथे 234 नवीन रुग्ण आढळले असून 148 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. येथे 86 रुग्ण उपचार घेत आहेत.
जर दिल्ली आणि हरियाणा राज्ये एकत्र केली तर नवीन प्रकरणांपैकी हे प्रमाण सुमारे 59 टक्के आहे. सोमवारी फक्त उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिल्लीत कोविड-19 चे 501 नवीन रुग्ण आढळल्याने, येथील एकूण संक्रमित लोकांची संख्या 18 लाख 69 हजार 051 झाली आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 26 हजार 160 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिल्ली-NCR मधील अनेक शाळांमधील विद्यार्थी हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विद्यार्थ्यांना संसर्ग होत असल्याने आता सुरू झालेल्या शाळा बंद करण्यात येत असून ऑनलाईन क्लास सुरू करण्यात आले.
कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात लहान मुलं; नेमका किती धोका?, तज्ज्ञ म्हणतात...
राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. नव्या लाटेत शेकडो चिमुकले संक्रमित होत आहेत. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादच्या अनेक शाळेतील मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर तज्ज्ञांनी काहीही काळजी करण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे. मुलांमध्ये काही हलकी लक्षणं आढळून येत आहेत. लहान मुलं लवकर बरी होत आहेत. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांना घाबरण्याची गरज नाही. कारण डेटानुसार मुलांना जरी लागण झाली तरी त्यांच्यात फार कमी लक्षणं दिसतात आणि ती लवकर बरी देखील होत आहेत. जी मुलं लस घेण्यास पात्र आहेत त्यांनी जरूर लस घ्यावी. ICMR चे एडीजी समीरन पांडा यांनी 1 ते 17 वयोगटातील मुलांनी कोरोनाची लागण होऊ शकते याचे पुरावे असल्याचं म्हटलं आहे. पण मृत्यूचा धोका कमी असल्याचं सांगितलं आहे.