नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढली आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडामध्ये (Noida) गेल्या 7 दिवसांत 44 मुलांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, लोकांना सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्या 7 दिवसांत 44 मुलांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी 16 मुले 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. नोएडामध्ये कोरोनाचे एकूण 167 रुग्ण आहेत. बाधित मुलांची टक्केवारी 26.3 आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील कुमार शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, याआधी गुरुवारी 15 मुलांसह कोरोना व्हायरसच्या 44 नवीन प्रकरणांची पुष्टी झाली होती. प्रशासनाकडून लोकांना मास्क लावण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितले जात आहे.
कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढलीदेशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 949 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 4,30,39,972 झाली आहे. याचबरोबर, सक्रिय प्रकरणांची संख्या देखील 11,191 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनामुळे मृत्यूची आणखी 6 प्रकरणे समोर आल्यानंतर मृतांचा आकडा 5,21,743 वर पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 133 ने वाढली आहे. रिकव्हरी रेट 98.76 टक्क्यांवर गेला आहे. आकडेवारीनुसार, डेली कोरोना पॉझिटिव्ह रेट 0.26 टक्के आणि विकली पॉझिटिव्हिटी रेट 0.25 टक्के झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर आजारही होते.