नवी दिल्ली - देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतल्याबद्दल मोदींनी देशवासीयांची माफी मागितली. मात्र देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्स वाढवण्याचे आणि इमोशनल डिस्टन्स कमी करण्याचे भावनिक आवाहन मोदींनी देशवासियांना केले. मन की बात दरम्यान मोदी म्हणाले की, ''मी तुम्हाला सोशल डिस्टन्स वाढवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र या काळात तुम्ही इमोशनल डिस्टन्स घटवू शकता. तुम्ही आपले सगेसोयरे, जुने मित्र, तसेच अन्य परिचितांशी बोलू शकता.'' तसेच होम कॉरेंटाईन असलेल्या लोकांसोबत काही जण गैरवर्तन करत असल्याचे समोर आले आहे. असे करणे चुकीचे आहे. अशा लोकांसोबत आपण संवेदनशीलतेने वागले पाहिजे, असेही मोदींनी सांगितले.
मन की बात च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, ''आज देश आणि संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहे. आपल्या देशासमोर आलेल्या संकटामुळे मला लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. या कठोर निर्णयासाठी मला माफ करा. मी सर्वांना घरात कोंडून ठेवले आहे. पण कोरोनापासून वाचण्यासाठी इतर कुठला पर्याय नव्हता.''
कोरोनापासून बाचावासाठी सर्व मानवजातीला संकल्प करावा लागणार आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे पुढच्या अनेक दिवसांपर्यंत पालन करावे लागणार आहे. तसेच काही लोक लॉकडाऊनचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र लॉकडाऊनचा नियम तोडल्यास कोरोनापासून वाचता येणार नाही. इतर काही देशांनी याचा अनुभव घेतला आहे. कोरोनाची लढाई म्हणजे जीवन मरणाची लढाई आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या असे आवाहन मोदींनी केले.