नवी दिल्ली – आयसीएमआरच्या नव्या गाइडलाइननंतर कोरोना किटच्या मागणीत वाढ झाली आहे. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या विना लक्षण असलेल्यांना कुठल्याही चाचणीची गरज नाही असं आयसीएमआरनं म्हटलं आहे. त्यानंतर आता लोकांनी खासगी किट खरेदी करणं सुरु केले आहे. खासगी किटमध्ये संबंधित रुग्ण संक्रमित आहे की नाही हे सरकारला सांगणं गरजेचे नाही. त्यामुळे याचाच फायदा घेत संक्रमित झाल्यानंतर अनेकजण याची माहिती कुणाला देत नाहीत.
दिल्ली केमिस्ट एँन्ड ड्रग्स असोसिएशनचे सदस्य प्रियांश गुप्ता म्हणाले की, अलीकडे अचानक खासगी किटची डिमांड वाढली आहे. लोकं मोठ्या संख्येने खासगी किट खरेदी करत आहेत. जेव्हा एका हिंदी वृत्तवाहिनीने कोरोनाच्या टेस्टिंग किटचा वापर केला. तेव्हा अवघ्या ३-४ मिनिटांत संबंधित व्यक्ती संक्रमित आहे की नाही हे कळतं. या किटची किंमत २५० रुपये इतकी आहे. जर कुणालाही कोरोना झाल्याचा संशय वाटत असेल तर तो घरबसल्या या किटच्या मदतीने संक्रमित आहे की नाही? हे शोधू शकतो.
संक्रमित असूनही लोकं माहिती लपवतात
खासगी किटच्या वापरा गैरफायदा घेत अनेक जण संक्रमित असतानाही ही माहिती लपवून ठेवतात. ही माहिती सरकारला मिळत नसल्याने कोरोना संक्रमितांचे आकडे योग्यरित्या उपलब्ध होत नाहीत. जर कोणत्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असतील आणि त्याने टेस्ट केली नाही. मग तो भलेही ठीक झाला तरीही तो दुसऱ्यांसाठी डोकेदुखी ठरु शकतो. विशेष म्हणजे ज्या लोकांना यापूर्वीच आजार असेल त्यांच्यासाठी हे धोकादायक आहे असं गंगारमाक मेडिसिन विभागाचे डॉ. एम वली यांनी सांगितले.
‘या’ लोकांना चाचणीची गरज नाही
कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याची आता आवश्यकता नाही. त्याऐवजी संपर्कातील हाय रिस्क गटात मोडणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याचाच अर्थ कोरोना बाधिताच्या संपर्कातील वृद्ध व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तीची चाचणी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. जी व्यक्ती लक्षणेविरहित आहे अशा व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असेही ICMR नं त्यांच्या नियमावलीत म्हटलं आहे.