नवी दिल्ली - देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात संक्रमित लोक सहभागी झाल्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे बोलले जात आहे. देशात गेल्या २४ तासात ३५४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ओळख पटली आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी देशाच्या वेगवेगळ्या भागांत जमातमधील लोकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 25 हजार 500 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. सोमवारी राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८६८ वर पोहचली आहे. तसेच मागील २४ तासांत मुंबई शहर उपनगरात ५७ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या ४९० वर जाऊन पोहोचली आहे. तर मुंबईत शनिवारी व रविवारी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहर उपनगरातील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. राज्यभरासह देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS)संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे.
देशात गेल्या २४ तासात ३५४ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४४२१ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांचा आकडा ११४ वर पोहोचला आहे. देशातील ४४२१ कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ३९८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३२५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतात काही ठिकाणी कोरोना व्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असल्याची चिंताजनक माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. 'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी असल्याचे गुलेरिया यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.