नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,16,46,081 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,951 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 212 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,59,967 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान उत्तराखंडमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही सरकारचं नीट लक्ष आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कुंभमेळा काळात कोरोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला आहे. दररोज 10 ते 12 स्थानिक नागरिक आणि 10 ते 20 भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने उत्तराखंड सरकारला अलर्ट केलं आहे.
राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर देशात कोरोनाचा धोका वाढल असून कुंभमेळा होत असल्याने केंद्र सरकार सतर्क झालं आहे. हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी करण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची केंद्रीय पथकाने पाहणी केली. या पाहणीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंडच्या सचिवांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने पॉझिटिव्ही रेट वाढण्याची भीती आहे.
"कुंभमेळ्यातील शाही स्नानानंतर स्थानिकांमध्ये कोरोनाचं संक्रमण होऊन उद्रेक होऊ शकतो"
हरिद्वारमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याला अनेक राज्यांतून भाविक येऊ शकतात. तर दुसरीकडे कुंभमेळा जवळ येत असतानाच दररोज 10 ते 20 भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत असं केंद्रीय पथकानं नमूद केलं आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानानंतर स्थानिकांमध्ये कोरोनाचं संक्रमण होऊन उद्रेक होऊ शकतो असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी उत्तराखंडच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भाविक राज्यात येणार आहेत, त्यामुळे दिवसाला 50 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि 5 हजार आरटीपीसीआर चाचण्या पुरेशा नाहीत.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोना चाचण्या वाढवण्यात याव्यात. त्याचबरोबर भाविकांबरोबरच स्थानिक नागरिकांच्याही चाचण्या करण्यात याव्यात, असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंड सरकारला सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातही कोरोनाचा धोका पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा एक कोटीवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल दीड लाख लोकांचा बळी घेतला आहे. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
धोका वाढला! महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना 'या' राज्यात बंदी, कोरोनामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय
मुंबई आणि महाराष्ट्राची आकडेवारी आता चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे मुंबई आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे हे संकेत आहेत. याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर 20 मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशात गुरुवारी कोरोनाचे 917 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या आकड्यानंतर राज्यात एकूण कोरोनारुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 957 झाली आहे. मध्य प्रदेशात सध्या 6 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. अनेकांवर उपचार सुरू आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत 20 मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लोक आपल्या खासगी वाहनानं येऊ-जाऊ शकतात.