नवी दिल्ली – संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस हळूहळू भारतात झपाट्याने वाढत चालला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. देशासाठी २१ दिवस महत्त्वाचे आहेत. जर आपण हलगर्जीपणाने वागलो तर मोठा अनर्थ घडेल असा गर्भीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शनिवारी एका दिवसात सर्वात जास्त १९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९८७ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा २४ झाला आहे. आतापर्यंत जगातील देशाचं पाहिलं तर जोपर्यंत यावर नियंत्रण आणत नाहीत तोपर्यंत कोरोना वाऱ्याच्या वेगाने लोकांना शिकार बनवतो. दिवसाला कोरोनाचे रुग्ण वाढत जातात. भारताची आकडेवारी पाहिली तर संशयितांची तपासणी योग्यरित्या होत नसल्याचं दिसून येत आहे. जितक्या प्रमाणात चाचणी केली जाईल हे आकडे आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
असाच आरोप अमेरिकेवरही केला जात आहे. संशयितांची तपासणी कमी प्रमाणात होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसते. जेव्हा तपासणी योग्यरितीने होईल हा आकडा वाढेल. ९ दिवसांपूर्वी अमेरिकेत १८,२०० कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता अमेरिकेत १ लाख २३ हजारांहून अधिक रुग्ण आहेत, २ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत ९२ हजार ४७२ रुग्ण आहेत. यातील १० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये ७३ हजार २३५ रुग्ण आहेत. तर ५ हजार ९८२ मृत्यू झालेत. स्पेनपाठोपाठ जर्मनी ५७ हजार ६९५ कोरोनाबाधित आढळलेत. तर ४३३ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगभरात ६ लाख ६३ हजार ७४० लोक कोरोनाच्या विळख्यात अडकलेत तर ३० हजार ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी २१ मार्चनंतर जलदगतीने सुरु झाली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. अनेक राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय आहे. कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या संक्रमणाची साखळी तोडायलाच हवी. सोशल डिस्टंस केवळ रुग्णासाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचा आहे. पंतप्रधानालाही हे गरजेचे आहे. यामुळे चुकीचा विचार करू नका. आप्तेष्ठांना आणि पुढे जाऊन देशाला मोठ्या संकटात टाकाल. बेजबाबदारपणा असाच राहिल्यास भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता.