नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्यांदा चौकशी करावी, असे अमेरिकेने शुक्रवारी म्हटले होते. अशी चौकशी होणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे सांगत भारताने त्या गोष्टीला पाठिंबा दर्शविला आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा उगम नेमका कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चौकशी सुरू केली होती. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक सखोल पाहणी करून ठोस निष्कर्ष काढले जाण्याची आवश्यकता आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चौकशीला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे कोरोना साथीच्या उगमाबद्दल नीट माहिती मिळण्यास मदत होईल. कोरोनाचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वुहानला जानेवारी महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक पाठविले होते. तिथे तज्ज्ञांचे पथक सुमारे महिनाभर राहिले. कोरोनाचा विषाणू वटवाघळातून एखाद्या वेगळ्या प्राण्याद्वारे माणसांमध्ये संक्रमित झाला असावा, असे मत चिनी शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये व्यक्त केले होते. वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू हवेत मिसळला गेल्याची शक्यता चिनी शास्त्रज्ञांनी फेटाळून लावली होती.
जागतिक आरोग्य संघटनेबद्दल नाराजीकोरोना विषाणू वटवाघळांतून संक्रमित झाला असावा ही एक शक्यता आहे तर या विषाणूची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेत झाली असावी अशी दुसरी शक्यता व्यक्त केली जाते. कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आजवर केलेली चौकशी अपुरी व असमाधानकारक आहे. आता या विषयाची दुसऱ्यांदा चौकशी अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, असे अमेरिकेने म्हटले आहे.