नवी दिल्ली : देश कोरोनाच्या नव्या लाटेशी समर्थपणे मुकाबला करत असून त्यात मोठे यशही मिळाले आहे. स्वदेशी लसींवर नागरिकांनी दाखविलेला विश्वास हे भारताचे मोठे सामर्थ्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यंदाच्या वर्षात ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मोदी बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येतही आता घट होऊ लागली असून ते सकारात्मक चिन्ह आहे. देशातील साडेचार कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी लसीकरण सुरू झाल्यापासून तीन ते चार आठवड्यांत १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे ६० टक्के मुलांना ही लस मिळाली. लोक सुरक्षित राहिले तरच दैनंदिन व्यवहार व आर्थिक घडामोडीही सुरू राहतील.मोदी यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सुरुवात आता दरवर्षी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून होईल व हा सोहळा महात्मा गांधी यांच्या ३० जानेवारीला असलेल्या स्मृतिदिनापर्यंत चालणार आहे. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीनीकरण केल्याचेही देशातील नागरिकांनी स्वागत केले आहे. पद्म पुरस्कार मिळालेल्यांपैकी अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात नाहीत. मात्र, अशा व्यक्तींच्या कार्याचा देशाच्या विकासात मोठा हातभार आहे.
काॅलरवाल्या वाघिणीबद्दल जिव्हाळा पेंच व्याघ्र प्रकल्पातील राणी या वाघिणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिने आजवर २९ पिल्लांना जन्म दिला होता. गळ्यात कॉलर लावलेली असल्याने तिला काॅलरवाली वाघीण म्हटले जात असे. तिच्या मृत्यूनंतर देशातील असंख्य नागरिक हळहळले. त्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला.
भारताला भ्रष्टाचारमुक्त करापंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भ्रष्टाचार हा वाळवीसारखा असून तो सारा देश पोखरतो. भ्रष्टाचारापासून भारताची मुक्तता करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.