नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची (Coronavirus) 3.46 कोटी प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर या महामारीमुळे 4.6 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यूदर 1.36 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी शुक्रवारी लोकसभेत (Lok Sabha) ही माहिती दिली. यासोबतच, भारतात 10 लाख लोकसंख्येमागे 25,000 कोरोना प्रकरणे आणि 340 मृत्यूची नोंद झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी कोरोना व्हायसरशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारचे कौतुकही केले. मोदी सरकारच्या काळात कमकुवत आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम सुरू आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मागील सरकारांना दोष न देता सरकारने परिणामांसाठी काम केले. गेल्या 2 वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील निर्णयावरून हे दिसून येते की, हे सरकार शक्तीने नव्हे तर इच्छाशक्तीने काम करते, असे मनसुख मांडविया म्हणाले.
गेल्या 24 तासांत 9,216 नवीन रुग्णदरम्यान, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 9,216 नवीन रुग्ण आढळल्याने, कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची एकूण संख्या 3,46,15,757 वर पोहोचली आहे. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 99,976 वर पोहोचली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अपडेट आकडेवारीनुसार, संसर्गामुळे केरळमध्ये 320 लोकांसह आणखी 391 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4,70,115 झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर 98.35 टक्केमंत्रालयाने सांगितले की, देशात सलग 159 व्या दिवशी दररोज 50,000 पेक्षा कमी संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून 99,976 झाली, जी एकूण प्रकरणांच्या 0.29 टक्के आहे. हा दर मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावर बरे होण्याचा दर 98.35 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 213 ने वाढली आहे.
देशात मृत्यूदर 1.36 टक्केआरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज संसर्ग होण्याचे प्रमाण 0.80 टक्के आहे. गेल्या 60 दिवसांपासून हा दोन टक्क्यांहून कमी राहिला आहे. साप्ताहिक संसर्ग दर 0.84 टक्के आहे, जो गेल्या 19 दिवसांपासून एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 3,40,45,666 झाली आहे, तर मृत्यूदर 1.36 टक्के आहे. देशात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कोरोना लसीचे 125.75 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.