नवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढत होताना दिसत आहे. भारतातील रुग्णांची संख्या 140पर्यंत पोहोचली आहे. दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या रोगानं पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोलकात्यात कोरोना संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे. त्याशिवाय भारतीय लष्करातील एक जवानही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे. कोलकात्यात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला असून, तो रुग्ण लंडनवरून परतला आहे. रुग्णाला बालीघाटमधल्या आयडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसचं हे पहिलंच प्रकरण आहे. ब्रिटनवरून परतलेला हा रुग्ण कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्या रुग्णाचे आई-वडील आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 18 वर्षांचा हा तरुण 15 मार्च रोजी ब्रिटनवरून परतला होता. आता त्या तरुणासह आई-वडील आणि चालकाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. लडाखमधला जवान पॉझिटिव्हकोरोना व्हायरसच्या विळख्यात सामान्य व्यक्तीही सापडत आहेत. परंतु भारतात पहिल्यांदाच एका जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. लडाखमधला हा जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जवानासंबंधी अधिक माहिती मिळालेली नाही. परंतु त्या जवानाचे आईवडील इराणवरून परतले होते. दुसरीकडे राज्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून परतलेल्या एका ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 41 झाली आहे.
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली असून गेल्या दोन दिवसांत इराण येथून लष्कराने 289 भारतीयांना परत आणले आहे. या वेलनेस सेंटरमधील जवळपास 20 हॉलमध्ये या सर्वांवर लष्कराचे डॉक्टर उपचार करत आहे. चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे.