नवी दिल्ली - मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. (Coronavirus in India) गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (India reports 94,052 new Covid-19 cases, 1,51,367 discharges & 6148 deaths in last 24 hrs)
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे ९४ हजार ०५२ नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र काल दिवसभरात देशात तब्बल सहा हजार १४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. एका दिवसात झालेली सहा हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद ही कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यापासूनची एका दिवसातील सर्वांधिक मृत्यूंची नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबळींची दैनंदिन संख्या सातत्याने घटत होती. गेले काही दिवस तर हा आकडा तीन हजारांच्याही खाली आला होता. मात्र काल एका दिवसांत झालेल्या सहा हजारांहून अधिक कोरोनाबळींच्या नोंदीमुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांतील ९४ हजार ०५२ रुग्णांच्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात झालेल्या ६ हजार १४८ मृत्यूंमुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींचा आकडा ३ लाख ५९ हजार ६७६ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, काल १ लाख ५१ हजार ३६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ एवढी झाली आहे.
देशात सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील लसीकरणाचा वेगही वाढत असून, आतापर्यंत २३ कोटी ९० लाख ५८ हजार ३६० जणांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे.
दरम्यान, एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूंची नोंद होण्यामागे बिहारमध्ये आरोग्य विभागाने कोरोनाबळींच्या संख्येत आधीच्या मृत्यूंची भर घालून केलेली वाढ हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये कोरोनाबळींच्या आकडेवारीत करण्यात आलेल्या सुधारणेमुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ४५८ वरून थेट ९ हजार ४२९ वर पोहोचली आहे.