नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमी झालेल्या खनिज तेलाच्या किमतीचा लाभ उठविण्यासाठी भारत आपल्याकडील भूमिगत गोदामांमध्ये खनिज तेलाचा साठा करून ठेवणार आहे. आणीबाणीच्या काळात देशाला ९.५ दिवस पुरेल इतका साठा या गोदामांमध्ये करता येऊ शकतो. यासाठी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इराककडून तेलाची खरेदी केली जाणार आहे.सरकारने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात भूमिगत तेल गोदामे तयार केली आहेत. मंगळुरू येथील गोदामाची क्षमता १५ लाख टनाची आहे. यापैकी निम्मी क्षमता अबुधाबीच्या नॅशनल ऑइल कंपनीने खरेदी केली आहे. ही कंपनी येथे ७.५ लाख टन तेलाची साठवणूक करते. येथील ७.५ लाख टनाचा साठा अद्याप रिक्त असून, तो संयुक्त अरब अमिरातीकडून तेल खरेदी करून भरला जाणार आहे.कर्नाटकातीलच पादूर येथे असलेल्या गोदामाची क्षमता सर्वाधिक म्हणजे २५ लाख टनांची आहे. यामधील निम्मी जागा अबुधाबीच्या नॅशनल आॅइल कंपनीने खरेदी केली आहे, मात्र कधीही वापर केलेला नाही. येथील निम्मे क्षेत्र रिक्त असून, तेथे तेल साठविले जाणार आहे. विशाखापट्टणम् येथील गोदामामध्ये फारशी जागा शिल्लक नाही. मात्र जी जागा शिल्लक आहे, ती भरण्यासाठी इराककडून तेलाची खरेदी करण्याची तयारी सुरू आहे.ग्राहकांना मात्र फायदा नाहीलॉकडाऊनमुळे देशातील वाहतूक जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या खपात मोठी कपात घाली आहे. दररोज इंधन कंपन्यांचे जाहीर होणारे विक्री दर आता बंद आहेत. त्यामुळे कमी झालेल्या किमतीचा लाभ ग्राहकांना मिळत नाही. पेट्रोलपंपांवरील उलाढाल खूपच कमी झाल्याने दैनंदिन खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पंपचालकांपुढे आहे.
CoronaVirus: खनिज तेलाच्या घटलेल्या दरांचा भारत फायदा घेणार; तेलाचा साठा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 2:01 AM