नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, देशात 78 जिल्हे कोरोना फ्री झाले आहे. मात्र, गेल्या 24 तासांत 1409 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत देशात 21 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21,393 वर पोहोचली आहे. यामध्ये 4 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनापासून 300 रुग्ण बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच, देशातील 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मात्र, गेल्या 24 तासांत 1409 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.
याचबरोबर, देशातील ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्यासाठी कृषी कामांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या बॅक साइड अटेंडेट आणि देखभाल सेवांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे, असे गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.
याशिवाय, प्रीपेड मोबाईल रिचार्ज सेवा, शहरी भागात असलेले फूड प्रोसेसिंग उद्योग जसे की दूध प्रक्रिया युनिट्स, ब्रेड फॅक्टरी, पीठ गिरण्या यांना सूट देण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे दुकान आणि उन्हाळा लक्षात घेता इलेक्ट्रिक पंख्यांची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, असेही पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. कोरोनावर उपाय योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावलं उचलली आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. येत्या 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.