कानपूर – भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, गेल्या २४ तासांत ८९ हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले, कोविडपासून बचावासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे, सध्या देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे, यात ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या कोरोनाची लस देण्यात येत आहे.
कोरोनासारख्या धोकादायक व्हायरससोबत लोकं लढत असताना कानपूरमध्ये एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका नर्सने महिलेला दोन वेळा कोरोना लस टोचली आहे. कानपूरच्या मडौली येथे लसीकरण केंद्रावर कमलेश देवी नावाची महिला लस घेण्यासाठी पोहचली होती, त्यावेळी मोबाईलमध्ये व्यस्त असणाऱ्या नर्सने महिलेला एका ऐवजी दोन वेळा लस टोचली, महिलेने नर्सला सांगितल्यानंतर तिने चूक कबूल केली, परंतु महिलेच्या नातेवाईकाला याची माहिती मिळताच खळबळ माजली.
कमलेश देवीने सांगितले की, नर्स मोबाईलवर कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त होती, फोनवर बोलता बोलता मला लस टोचली, मी त्याच ठिकाणी बसली होती, मला तिथे उठण्यास सांगितले नाही, फोनवर बोलताना तिच्या लक्षात आलं नाही की मला पहिला डोस दिला आहे. त्यानंतर दुसऱ्याने तिने मला लस टोचली, तेव्हा मी २ वेळा लस का दिली? त्यावर तिने सांगितले एकदाच दिली, मी म्हटलं मला दोनवेळा लस दिली, तेव्हा तिने रागात मला तुम्ही उठून का गेला नाही असं विचारलं, तेव्हा मी तुम्ही सांगितलं नाही, म्हणून इथेच बसली, मला माहिती नाही एक लस देतात की दोन असं महिलेने सांगितले.
ही महिला सध्या ठीक असून त्यांच्या हाताला सूज आली आहे, या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला, घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले, त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीएमओ राजेश कुमार यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, एका व्यक्तीला दोनदा लस दिली जाऊ शकत नाही, हे शक्य नाही, टीमला चौकशीचे आदेश दिलेत, रिपोर्ट आल्यानंतर यावर कठोर कारवाई केली जाईल, हा बेजबाबदारपणा आहे, एका चुकीनं मोठं नुकसान सहन करावं लागलं असतं असं त्यांनी सांगितले.