नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लढ्यात लष्कारानेही पुढाकार घेतला आहे. लष्कर म्हणून कोरोनाविरुद्ध लढण्याची जबाबदारी आम्ही समजतो. आम्हाला जे बजेट दिले आहे, त्याचा योग्य उपयोग केला जाईल आणि कोरोनाशी सामना करण्यासाठी लष्कर कोणत्याही ऑपरेशनल टास्कसाठी तयार आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी सांगितले.
मला तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, आपल्या सर्व जवानांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे. आम्ही हे सुनिश्चित करण्यास सक्षम आहोत की कोरोनाचा प्रसार होणार नाही. तसेच, आपण सुरक्षित आहोत याची खात्री करुन घ्यावी लागेल, कारण जर आपले लष्कर, नौदल आणि वायू सेनेच्या जवानांना या विषाणूचा परिणाम झाला तर आपण आपल्या लोकांचे संरक्षण कसे करणार, असा सवालही बिपीन रावत यांनी केला.
कोरोनाचा परिणाम तिन्ही दलात मर्यादित प्रमाणात झाला आहे. शिस्त व धैर्य आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत झाली आहे. ही वेळ अशी आहे की जेव्हा काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. साथीच्या आजारावर लढायचे असल्यास आपल्याला त्याचे अनुसरण करावे लागेल. धैर्य आणि शिस्त आम्हाला कोरोनाच्या संकटावर मात करण्यास मदत करेल, बिपीन रावत म्हणाले.
वैज्ञानिक आणि वैद्यकीय संशोधनाशी संबंधित इतर संस्थां देशातील वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन आल्या आहेत, ज्या आतापर्यंत आम्ही अन्य देशांतून आयात करत होतो. याशिवाय, या कोरोनाने आपल्याला हा धडा शिकविला आहे की आता स्वावलंबी होण्याची वेळ आली आहे, असेही बिपीन रावत यावेळी म्हणाले.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १९९० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २६४९६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये ५८०४ जण बरे झाल आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे.