मुंबई - देशात कोरोनाचा फैलाव वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ आणि अत्यावश्यस सेवेतील सर्वच कामगार कर्मचारी जीवाचं रान करत आहेत. मात्र, या काळात काही नागरिकांकडून पोलिसांसोबत हुज्जत घातली जाते, कुठे डॉक्टरांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे डॉक्टर भयभीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये तपासणी कारण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर जमवाकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. तर, दिल्लीतही तबलिगी समाजाच्या रुग्णांकडून डॉक्टरांशी अश्लील वर्तणूक केल्याच्या बातम्या आल्या होत्या.
सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका नर्सची दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे, लॉकडाऊ काळात सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील स्टाफचं सर्वत्र कौतुक होत असताना, अशा घटनांमुळे त्यांना मानिसक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्याचे कुटुंबही चितातूर झाले आहे. त्यामुळे, इंडियन मेडिकल असोसिएशनने २२ एप्रिल रोजी देशात व्हाईट अटर्ल पाळण्याचे निर्देश दिले आहेत. तर, २३ एप्रिल रोजी ब्लॅक अलर्ट पाळण्याच्या सूचना वैद्यकीय स्टाफ अन् डॉक्टर्संना देण्यात आल्या आहेत.
कोरोना महामारीच्या काळात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या डॉक्टरांवर देशभरात हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. या हल्ल्यांचा निषेध करत आयएमएने २२ एप्रिल रोजी 'व्हाइट अलर्ट' पाळायचे निर्देश दिले आहेत. यात सर्व डॉक्टर आणि रुग्णालयांनी मेणबत्ती लावून होणाऱ्या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करायचा आहे. याखेरीज, डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याकरिता केंद्र स्तरावर कायदा करण्याची मागणीही आयएमएने केली आहे. ही मागणी तातडीने पूर्ण न केल्यास २३ एप्रिल रोजी आयएमएच्या वतीने 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे. यात सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आदेश इंडियन मेडिकल असोसिएशनने दिले आहेत.
दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 16,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर पोहोचली आहे. सोमवारी (20 एप्रिल) राज्यात 283 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील तब्बल 187 नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर ठाण्यातही कोरोनाचे आणखी 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे.