नवी दिल्ली – गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं जगातील प्रत्येक देशावर संकट उभं केले आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकं कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यात कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटनं चिंतेत भर घातली आहे. सध्या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकमेव लसीकरणाचा पर्याय आहे. त्याचसोबत जगभरात अनेक संशोधक रात्रंदिवस या महामारीशी लढण्यासाठी औषधांचा शोध घेत आहे.
यात भारतातील आसामधील दोन संशोधकांनी कोविडविरुद्ध आयुर्वेदिक पेयाचा शोध लावला आहे. भुवनेश्वरच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूविरोधात हे हर्बल पेय ९८ टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे. धेमाजी जिल्ह्यातील पंकज गोगाई आणि गोलाघाट येथील प्रांजल गम यांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पसरलेल्या भागातील वनस्पतींच्या मिश्रणापासून बनवलेल्या पेयाचं पेटंटसाठी अर्ज दिला आहे. पारंपारिक हर्बल औषध म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो.
केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्समध्ये या पेयाची चाचणी करण्यात आली. गेल्या २५ ऑगस्ट २०२१ रोजी आलेल्या रिपोर्टमध्ये हे पेय कोविड १९ विषाणूविरोधात ९८ टक्के प्रभावी असल्याचं सांगितले अशी माहिती पंकज गोगाई यांनी दिली. द हिंदूमध्ये त्यांची मुलाखत आली आहे. या प्रयोगशाळेने हर्बल ड्रिंकच्या सायटोटॉक्सिसिटी पातळीचीही चाचणी केली. ६ ऑक्टोबरच्या अहवालात ती संक्रमित पेशींवर अत्यंत प्रभावी असल्याचं म्हटलं.
या दोन्ही संशोधकांनी केंद्र सरकारच्या मंत्रालयांशी संपर्क साधला होता. तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने २८ डिसेंबर रोजी त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. परंतु आयुष मंत्रालयाने अद्याप प्रतिसाद दिला नाही. २ जानेवारीला बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना क्लिनिकल चाचणी आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या मान्यतेसाठी बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलशी संपर्क साधण्यास सांगितले. गोगाई आणि गम यांनी नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँन्ड इंटिग्रेटिव्ह हेल्थ आणि यूएस नॅशलन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थलाही हर्बल ड्रिंक्सचा वापर करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या सल्ल्यानुसार, धेमाजी जिल्ह्याच्या उपायुक्तांना आम्ही अर्ज सादर केला आहे. ही वन औषधींच्या देशी ज्ञानावर बनवलेले पेय वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे असंही गोगाई यांनी सांगितले.