नवी दिल्लीः कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्यासुद्धा नियंत्रणात आणणं अनेक देशांना कठीण जात आहे. कोरोनाचं केंद्रबिंदू वुहान शहर असल्यानं चीनबद्दल अनेक देशांमध्ये नाराजी आहे. चीनकडूनहीभारतातल्या महत्त्वाच्या कंपन्यांची मालकी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला मोदी सरकारनंही वेळीच वेसण घातलेलं आहे. आता चीनच्या संशयास्पद भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या छोट्या व्यावसायिकांनी चीनकडून सामान न मागवण्याचं ठरवलं आहे. छोटे व्यावसायिक आता चीनकडून थेट मशीन आणि तंत्रज्ञान आयात करण्याच्या तयारीत आहेत.छोट्या व्यावसायिक आणि उद्योगपतींनी पुढील एक वर्षासाठी चीनकडून वस्तू मागवण्यास नकार दिला आहे. चीनच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणात सामान्य ग्राहक चिनी वस्तू नाकारू शकतात ही भीती त्या व्यावसायिकांना सतावते आहे. त्यामुळे चीनकडून होणारी आयात कमी होणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. चीनमधून माल किंवा वस्तू आणून त्या भारतात विक्री करणारे व्यापारी आता त्या वस्तूच देशात तयार करण्याचा धोका पत्करण्याचा विचारात आहेत.उद्योजक नितीन अग्रवाल सांगतात की, ते व्यवसायासाठी वर्षातून किमान तीन वेळा चीनला जायचे. पण कोरोनाच्या उद्रेकानंतर ते पुढील वर्षभर तरी चीनमध्ये जाणार नाहीत. तसेच माझ्यासारखे बरेच व्यापारी फोनवरून चिनी व्यावसायिकांना आता ऑर्डर देणार नाहीत, कारण जगभरात चिनी व्यावसायिकांनी विश्वास गमावलेला आहे. कॉस्मेटिक वस्तूंचे व्यावसायिक दीपक अरोरा म्हणाले की, कोरोनाच्या वातावरणात माझ्यासकट शेकडो व्यापारी चीनवर असलेलं अवलंबित्व संपवण्यासाठी चीनकडून तयार वस्तू मिळण्याऐवजी मशीन व तंत्रज्ञान खरेदीची तयारी करीत आहेत.चीनविषयी कोरोनामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा चीनला फटका बसणार असून, ते पाहता चिनी वस्तूंच्या विक्रीवर निश्चितच परिणाम होऊ शकतो. आता लोक भारतात तयार होणा-या अत्यंत महागड्या वस्तूही खरेदी करतील, पण चीनच्या वस्तू खरेदी करणार नाहीत. पुढील वर्षापासून चीनकडून येणारी 50 टक्के आयात थांबविली गेली तर घरगुती उत्पादन कमीत कमी 30-35 अब्ज डॉलर्स कामाच्या स्वरूपात फायदा मिळू शकेल.2018मध्ये भारतानं चीनकडून 76.87अब्ज डॉलर्सची आयात केली होती, तर या काळात भारतानं चीनला फक्त 18.83 अब्ज डॉलर्सच्या सामानाची निर्यात केली. गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात चीनकडून 68 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली होती, तर भारताची निर्यात फक्त 16.32अब्ज डॉलर्स एवढीच होती. चीन भारतीय आयटी आणि फार्मा कंपन्यांना त्यांच्या बाजारात उत्पादने विकू देत नाही. भारत कापूस, सूत, फॅब्रिक, धातू यांसारख्या हलक्या वस्तूंची चीनला निर्यात करतो. दुसरीकडे भारत चीनकडून दूरसंचार उपकरणे, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अणुभट्ट्या, बॉयलर, यंत्रसामग्री अशा वस्तू आयात करतो.
CoronaVirus : भारतातल्या छोट्या व्यावसायिकांचा चीनकडून सामान न मागवण्याचा निर्धार; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 9:45 PM