नवी दिल्ली- चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं जगाला विळख्यात घेतलं आहे. अनेक देश कोरोनाच्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. कोरोनानं भारतातही आतापर्यंत ११ जणांचा जीव गेला असून, काही जण कोरोना बाधित असलेले सापडत आहेत. मंगळवारच्या आलेखावर नजर टाकल्यास एक चांगली बातमी समोर आली आहे. मंगळवारी ६४ नवे रुग्ण सापडले होते, ते सोमवारच्या तुलनेत फारच कमी होते. सोमवारी जवळपास ९९ रुग्ण समोर आले होते. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णांमध्ये आधीच्या तुलनेत घसरण होत असल्याचं निदर्शनास येतं आहे आणि ती भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ५६०वर गेली आहे.विशेष म्हणजे ४८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, त्यांची रुग्णालयातूनही मुक्तता करण्यात आली आहे. सोमवारी अशा रुग्णांची संख्या ३५ होती, ज्यात वेगानं वाढ होते आहे. त्यात महाराष्ट्रातल्याही ८ रुग्णांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्लीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. परंतु दिल्ली सरकारनं यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावलं आहे. मंगळवारी राजीव गांधी सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला श्वसनाचा त्रास आणि हृदयाशी संबंधित आजार असल्यानं त्याचा मृत्यू झाला.कोरोनाचा मुंबईत आणखी एक बळी गेला होता. 65 वर्षीय व्यक्तीस ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे 23 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर व्यक्ती 15 मार्चला यूएईवरून प्रवास करून अहमदाबाद येथे आली होती. त्यानंतर 20 मार्चला ती व्यक्ती मुंबईत आली, त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. रुग्ण गंभीर असल्याकारणानं उपचारादरम्यान 23 मार्चच्या संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस हा ईशान्यकडच्या राज्यांमध्येही पसरला आहे. मणिपूरमध्ये एक २३ वर्षांची मुलगी इंग्लंडहून परतली होती, तिच्याही कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. जर ती पॉझिटिव्ही आली, तर मणिपूरमधलं हे पहिलं प्रकरण असेल.
- असा होतो रुग्ण निगेटिव्ह
कोरोनाची लागण झालेला किंवा ज्याला लागण झाल्याचे संशय आहे, अशा रुग्णाला रूग्णालयात दाखल केले जाते. स्वॅबच्या साहाय्याने रुग्णाच्या घशातील लाळ घेऊन त्याची तपासणी करण्यात येते. त्यात तो रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर उपचार केले जाते. रुग्णाला १४ दिवस रुग्णालयात ठेवले जाते. या कालावधीत त्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. त्याला ताप, सर्दी, खोकला झाल्यास आवश्यक ती औषधे दिली जातात. या दरम्यान रुग्णाची अनेकदा तपासणी करण्यात येते. रुग्णाच्या दोन चाचण्या लागोपाठ निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण बरा झाला आहे, असे समजले जाते.