नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 25 लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 19 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 984 वर पोहचली आहे. तर 640 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 474 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 3870 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 50 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1383 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. बुधवारी ( 22 एप्रिल) आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. देशात आतापर्यंत 3000 हून अधिक लोकांनी कोरोनावर मात करून ही लढाई जिंकली आहे. सोमवारी (20 एप्रिल) या एका दिवशी तब्बल 705 रुग्ण बरे झाले आहेत. एकाच दिवशी ठीक होणाऱ्यांचा हा उच्चांक आहे. अनेक जण कोरोनाला हरवत आहेत. 15 एप्रिल रोजी 183 रुग्ण बरे झाले होते. त्यानंतर पुढच्या दिवशी 16 एप्रिल रोजी ही संख्या वाढून 260 वर पोहचली.
17 एप्रिल रोजी 243 जणांनी, 18 एप्रिल रोजी 239 जणांनी तर 19 एप्रिल रोजी 316 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात दिली. त्यानंतर 20 एप्रिल रोजी तब्बल 705 रुग्ण बरे झाल्याने रेकॉर्ड झाला आहे. महाराष्ट्रात 572 जणांनी, दिल्लीत 431 जणांनी तर केरळमध्ये 408 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर बिहारमध्ये 113 पैकी 42 रुग्ण आता बरे झालेत. तर उत्तर प्रदेशात 1184 पैकी 140 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तामिळनाडू 457, राजस्थान 205, तेलंगणा 190, मध्य प्रदेश 127, गुजरात 131 आणि हरियाणामध्ये 127 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांमध्ये केरळ राज्य आघाडीवर आहे.
Coronavirus : गुड न्यूज! तब्बल 705 रुग्ण एकाच दिवशी झाले बरे; ठरला आजपर्यंतचा उच्चांक
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मंगळवारी 552 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या 5 हजार 218 वर पोहोचली. तर 19 मृत्यूंची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा 251 झाला. त्याचप्रमाणे, मुंबईत 355 रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या 3 हजार 451 झाली आहे. तर शहर-उपनगरात 12 मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा 151 वर पोहोचला आहे. मुंबई शहर-उपनगरात कोरोनाचे 2 हजार 887 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. जगातही कोरोनाचा प्रकोप वाढत असून रुग्णांचा आकडा 25 लाख 36 हजारांवर गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
CoronaVirus: जगाचा आकडा २५ लाखांवर; राज्यात एकूण ५,२१८ रुग्ण
CoronaVirus: निर्बंध उठवण्याची घाई ठरेल घातक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा