नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 1035 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 7447 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 239 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1035 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 7447 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांचा आकडा 239 वर पोहोचला आहे. देशातील 7447 कोरोनाग्रस्तांपैकी 6565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 643 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी काय करता येईल याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतील असे समजते. मात्र हा निर्णय रविवारी जाहीर केला जाऊ शकेल. देशाला उद्देशून भाषण करून ते लॉकडाउन वाढविण्याची गरज का आहे, हे सांगतील, असा अंदाज आहे. पंतप्रधान या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतील. त्यानंतर मोदी आपल्या वरिष्ठ सहकारी मंत्र्यांशीही चर्चा करणार आहेत.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. ही सामुदायिक संसर्गाची शक्यता असू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन वाढवून जिथे अधिक रुग्ण आढळत आहेत, तिथे लोकांना अजिबात घराबाहेर पडू न देणे हाच मार्ग सरकारला दिसत आहे. त्याची राज्यांनी अधिक कडक अंमलबजावणी करावी, असा केंद्र सरकारचा आग्रह आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा
CoronaVirus लॉकडाउन संपणार की वाढणार? आज ठरणार
CoronaVirus कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुुरुवात?