संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाने जगभरातील 200हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं आहे. भारतातहीभारतात गेल्या २४ तासांत १,०३५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने देशातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यत देशात २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. त्यातच आता इंडिगो एअरलाईन्समधील एका कर्मचाऱ्याचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्याचे वय साधारण 55 ते 60च्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. हा कर्मचारी चेन्नईमध्ये एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर होता. शनिवारी मृत्यूनंतर आलेल्या रिपोर्टमध्ये हा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांची जबाबदारी इंडिगो कंपनी घेणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. पंरतु हवाई क्षेत्रामधील पहिलीच अशी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,०३५ नवीन रुग्ण आढळले असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे. त्यापैकी ६ हजार, ६३४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९६९ जण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. मात्र मृतांची आकडा २८८ वर गेला आहे. मुंबई, दिल्ली ही महानगरे आणि तामिळनाडू राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे.
जगातील २११ देशांमध्ये आतापर्यंत १७ लाख, ३५ हजार रुग्ण आढळून आले, त्यापैकी १२ लाख, ३० हजार जणांवर सध्या उपचार सुरू असून त्यापैकी ५० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, सुमारे ४ लाख रुग्ण या आजारातून बचावलेही आहेत. अमेरिकेमध्ये रुग्णांची संख्या ५ लाख, ३ हजारांवर गेली आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये १८ हजार, ९०० जण कोरोनामुळे मरण पावले आहेत आणि स्पेनमध्ये मृतांचा आकडा १६ हजार, ५०० वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने १३ हजार, २०० जणांचा तर ब्रिटनमध्ये ९ हजारांहून अधिक रुग्णांची बळी घेतला आहे.