नवी दिल्लीः देशात कोरोनानं थैमान घातलेलं असून, संक्रमितांची संख्यासुद्धा दिवसागणिक वाढतच चालली आहे. सामान्यांपासून प्रादुर्भावाला सुरुवात झालेल्या कोरोनाचं संक्रमण लष्करातही जाऊन पोहोचलं आहे. अशाच एका कोरोना संक्रमित जवानानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास लष्कराच्या बेस हॉस्पिटलमध्ये कोरोनो रुग्णाने आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता रुग्णालयातील वॉर्डाच्या मागील झाडावर नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्यानं आत्महत्या केल्याचं दिसलं. मृत जवानाची ओळख पटली असून, तो अलवर येथील सिग्नल कोर्समध्ये तैनात आहे. विशेष म्हणजे तो महाराष्ट्रातील आहे. त्या जवानाला फुफ्फुसाचा कर्करोग होता. लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. जवानाचा कोरोना चाचणीसाठी अहवाल पाठवला असता, तो संक्रमित असल्याचं समोर आलं आहे. त्या जवानाला ५ मे रोजी सैन्याच्या आर. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत जवानाचे कुटुंब अलवर येथे राहते. त्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.