Coronavirus : कोरोना विषाणूंच्या संसर्गशक्तीत जूनअखेरपासून झाली वाढ, आरोग्यस्थिती अधिक बिकट होण्याची तज्ज्ञांना भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:55 AM2021-07-12T09:55:33+5:302021-07-12T09:56:57+5:30
अभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीमध्ये (आर नंबर) जूनच्या अखेरीपासून मोठी वाढ झाली असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले. या साथीच्या दुसऱ्या लाटेने कळस गाठल्यानंतरची ही घटना आहे. त्यापायी कोरोना साथीमुळे आरोग्यस्थिती आणखी बिकट होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांना वाटत आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात जूनमध्ये घट झाली होती. मात्र २० जून ते ७ जुलै या कालावधीत संसर्गामध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. याच कालावधीत देशात विविध तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यातूनही कोरोनाचा प्रसार वाढला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१५ मे ते २६ जून या कालावधीत संसर्गाची पातळी ०.७८ ते ०.८८च्या दरम्यान होती. चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमधील शास्त्रज्ञ सीताभ्रा सिन्हा यांनी गणिती प्रारूपांच्या मदतीने या स्थितीचे विश्लेषण केले.
त्यांनी सांगितले की, सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्याचा वेग गेल्या काही दिवसांमध्ये मंदावला आहे. १०० कोरोना रुग्णांच्या एका गटामुळे आता ८८ लोकांना या आजाराचा संसर्ग होतो. पूर्वी हेच प्रमाण ७८ होते. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरून कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीबद्दल निष्कर्ष काढता येतो. विषाणूंमध्ये संसर्गशक्ती कमी असल्यास साथ मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
महाराष्ट्र, केरळमध्ये जास्त प्रमाण
महाराष्ट्र, केरळ वगळता अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीचे प्रमाण एकपेक्षा कमी आहे. तर महाराष्ट्र, केरळमध्ये हे प्रमाण अनुक्रमे १.१ व १ असे प्रमाण आहे. केंद्राने कोरोना साथीसंदर्भात नेमलेल्या कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले होते की, कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी होण्याच्या पातळीपासून आपला देश अद्याप खूप दूर आहे.