नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशात नवं संकट उभं राहिलं आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चीननंतर इटली, अमेरिकासारख्या देशांमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जगात ३ लाख ७८ हजार नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत तर १६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारने लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवली आहे. कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहे. देशात सध्या कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे सर्व जनजीवन ठप्प झालं आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. पण डॉक्टर्स, पोलीस आणि सफाई कामगार यांचे काय? लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे लोक प्रयत्नशील आहेत. अनेक स्तरातून या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. ओडिशातील एका डॉक्टरच्या आईचं निधन झाल्यानंतरही कर्तव्य पार पाडण्यासाठी डॉक्टर रुग्णालयात पोहचले. इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार १७ मार्च रोजी संबलपूर येथील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या ८० वर्षीय आईचं निधन झालं. या कठीण प्रसंगातही डॉ. अशोक दास ड्युटीवर पोहचले. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडली.
दिवसभर डॉ. अशोक यांनी अनेक बैठकांना हजेरी लावली. कोरोनापासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या. जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालयाला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. संध्याकाळी कामावरुन परतल्यानंतर त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले. अशा संघर्षाच्या परिस्थितीत सुट्टी न घेता डॉक्टर अशोक दास यांनी कर्तव्य पार पाडलं. त्यामुळे डॉक्टर अशोक दास यांच्या ध्येर्याला अनेकजण सलाम करत आहेत.
त्यामुळे लोकांनीही केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आपली आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी स्वत:च्या हाती आहे. डॉ. अशोक दास यांच्यासारखांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवावा तरच कोरोनापासून भारताला वाचवण्यात यश येईल.