नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशांतर्गत हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण थांबविले असून ही सेवा १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
भारतात कोरोनाचे रुग्ण हे बहुतांश परदेशातूनच आलेले आहेत. यामुळे देशातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. आज हा आकडा साडे सहाशेवर पोहोचला आहे. देशात गेल्या २४ तासांत ४२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सध्या ६४९ आहे. यापैकी ६०६ रुग्ण हे भारतात राहिलेले आहेत. तर ४७ रुग्ण हे परदेशातून भारतात आलेले आहेत. देशात आतापर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना तिसऱ्या आणि धोकादायक टप्प्याच्या उंबरठ्यावर असून देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून केवळ मालवाहू विमानांचे उड्डाण सुरू ठेवले जाणार आहे. याबाबतचे आदेश नागरी विमानोड्डाण मंत्रालयाच्या सचिवांनी काढले आहेत.