चेन्नई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते तथा राजकीय नेते कमल हसन यांच्या ‘मक्कल निधी मैयम पार्टी’च्या कार्यालयाच्या गेटवर चेन्नई महानगरपालिकेने शनिवारी ‘होम क्वारंटाईन’चे म्हणजेच घरातच विलगीकरणात राहण्याचे स्टिकर लावले होते. त्यामुळे कमल हसन यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अंदाज लावण्यात येत होता. काही वेळानंतर मात्र हे स्टिकर काढण्यात आले.
एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, अभिनेत्री गौतमी तडिमळ्ळी या नुकत्याच दुबईहून परतल्या आहेत. त्यांच्या पासपोर्टवर हा पत्ता होता. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांनी तेथे स्टिकर चिकटविले. त्यांचा सध्याचा नवा पत्ता लगेच कळू शकला नाही. या स्टिकरवरील मजकुरात असे म्हटले होते की, ‘कोरोना विषाणूपासून आमचे आणि चेन्नईचे रक्षण करण्यासाठी आम्ही घरातच विलगीकरणात आहोत.’ हे स्टिकर नंतर काढण्यात आले.
कमल हसन यांनी एक निवेदन जारी करून आपण विलगीकरणात नसल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या घराबाहेर स्टिकर लावण्यात आल्यामुळे मला विलगीकरणात ठेवण्यात आल्याची बातमी पसरली आहे. तथापि, आपण जाणताच की मी गेल्या काही वर्षांपासून तेथे राहत नाही.