नवी दिल्ली - कोरोनाबधितांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन' या औषधाची अमेरिकेला निर्यात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून वादाला तोंड फुटले आहे. या औषधाची निर्यात करण्याच्या निर्णयावरून देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.
कोरोनाबधितांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची अमेरिकेला निर्यात करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारने या औषधाच्या देशातील साठ्याची माहिती घेतली होती का? तसेच या औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांबाबत विचार केला होता का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्राधान्य दिले का? अशीही विचारणा काँग्रेसकडून करण्यात आली. तसेच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची निर्यात करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय म्हणजे त्यांनी देशाला दिलेला धोका आहे असा गंभीर आरोप काँग्रेसने केला.
तसेच भारताचे नागरिक आणि त्यांच्या गरजा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्राधान्यक्रमात नसल्याचा आरोपही काँग्रेसने ट्विटरवरून केला आहे. अनियोजितपणे केलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजुरांची मजुरी बुडाली तर मोठ्या प्रमाणात उपासमार दूर नाही, या अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी केलेल्या भाकीटाचा पुनरुच्चार काँग्रेसने केला आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारने उद्योगजगतासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली नाही. सरकारला दुसरे पॅकेज जाहीर करायला किती वेळ लागेल, अशी विचारणाही काँग्रेसने केली आहे.