नवी दिल्ली – जगभरात कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. जगातील २०० देशांना कोरोना फटका बसला आहे. भारतातही कोरोना व्हायरस रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. येत्या १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन असणार आहे. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारांच्या वर पोहचली आहे तर १४९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढवावा का? याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांशी केलेल्या संवादादरम्यान याबाबतचे मोठे संकेत दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, देशभरात कोरोना ग्रस्तांची संख्या ५ हजारांपेक्षा जास्त नोंद झाली असल्याने 14 एप्रिलला देशव्यापी लॉकडाऊन उठविणे शक्य होणार नाही. देशातील सध्याची स्थिती सामाजिक आणीबाणीसारखी आहे. त्यासाठी सतर्क राहणे आणि कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. राज्य, जिल्हा प्रशासन आणि तज्ज्ञांनी व्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याची शिफारस केली आहे असं म्हणाले. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार हे स्पष्ट आहे मात्र त्याच स्वरुप कसं असणार हे अद्याप स्पष्ट नाही.
या बैठकीनंतर लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनीही केंद्र सरकार १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवू शकतं असं विधान केले आहे. संसदेत प्रतिनिधित्व करत असणाऱ्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची पंतप्रधानांनी चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेण्यात आली.
१४ एप्रिलनंतर देशातील लॉकडाऊन उठवावा की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढवण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. तेलंगणा सरकारचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी देशातील लॉकडाऊन ३ जूनपर्यंत वाढवावा अशी शिफारस केली आहे. मात्र लॉकडाऊन वाढवण्याबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. अशातच पंतप्रधानांनी दिलेले संकेत देशव्यापी लॉकडाऊन १४ एप्रिलनंतरही सुरुच राहणार असे मिळत आहेत.