नवी दिल्ली – देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही दिवसांत कोरोना महामारीचे दिवसाला १ हजारपेक्षाही अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाने भारतात वेग पकडलाय का? असा प्रश्न निर्माण होतो. ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कारण अवघे काही दिवस लॉकडाऊनसाठी शिल्लक असताना देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणं चिंताजनक आहे.
याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) गुरुवारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलाराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ३ मे पर्यंत कोरोना व्हायरसची व्याप्ती आणखी वाढेल हे सांगणे फार कठीण आहे. तथापि, भारत अद्याप स्थिर स्थितीत आहे. सकारात्मकतेचा दर ४.५ टक्के वर स्थिर राहतो, त्या आधारावर देशाचा आलेख जलद गतीने वाढत नाही असं त्यांनी सांगितले.
कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी ३ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरु ठेवला आहे. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे गरजेचे आहे. सध्या भारतात २१ हजार ७०० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ७०० च्या वर लोकांचा जीव गेला आहे. गेल्या २४ तासात १ हजार ४०९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतर त्या रुग्णांप्रती समाजाची वागणूक शंकेसारखी असते. उपचारानंतर तो रुग्ण पूर्ण बरा झाला आहे हे स्वीकारायला समाज तयार नाही. त्यामुळे समाज अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना सापत्न वागणूक देतो. त्यामुळे ज्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसत आहेत त्यांची समोर येण्याची मानसिकता नसते. कारण त्यांना वाटतं की, मी दवाखान्यात गेलो अथवा हॉस्पिटला गेलो तर शेजारील लोक आपल्या कुटुंबाला वाळीत टाकतील त्यांना त्रास देतील असं एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. तसेच समाजाच्या अशा वागण्यामुळे कोरोनाग्रस्त वाढत आहेत आणि मृत्यूदरही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.