नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यंदाच्या वर्षी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिस्टंसिंग तसेच लॉकडाऊनच्या नियमांमुळे देशातील मोठ्या देवस्थानांपैकी एक असलेल्या जगन्नाथपुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. दरम्यान, अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने पुरी येथील जगन्नाथाची रथयात्रा आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
शेकडो शतकांची परंपरा असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेसाठी ओदिशामधील जगन्नाथ पुरी येथे लाखो भक्तजन देशविदेशातून येत असतात. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगन्नाथ यात्रेवर अनिश्चिततेचे सावट दाटले होते. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयानेही सुरुवातीला या यात्रेला परवानगी नाकारली होती. मात्र अखेरीस आज काही अटीशर्तींसह सर्वोच्च न्यायालयाने यात्रा आयोजित करण्यात परवानगी दिल्याने आता उद्या भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा पार पडेल.
जगन्नाथ रथयात्रेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा केंद्र सरकारने आपली भूमिका मांडताना यात्रेस परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. अखेरीस सर्व पक्षांचे म्हणणे विचारात घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी जगन्नाथ यात्रेस परवानगी दिली. मात्र जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन मंदिर समिती, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आरोग्याच्या मुद्याशी कुठलीही तडजोड न करता करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायलायने दिले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी दिलेल्या आदेशात नागरिकांच्या आरोग्यहितासाठी यावर्षी जगन्नाथ रथयात्रेला परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले होते.
नऊ दिवसांचा हा रथयात्रा महोत्सव २३ जूनपासून सुरू होईल. श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समिती आणि सेवेकऱ्यांनी राज्य सरकारला विनंती केली की, त्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या आदेशात बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका करावी. १७३६ पासून ही रथ यात्रा कोणताही अडथळा न येता सुरू राहिली होती. १५५८ आणि १७३५ यादरम्यान मुघलांच्या स्वाऱ्यांमुळे ३२ वेळा रथयात्रा झाली नव्हती, असे जगन्नाथ संस्कृतीचे संशोधक भास्कर मिश्र यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या