नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,32,89,579 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,404 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 339 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,43,213 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. अशातच लोकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे.
रस्त्यावर लोक मास्क शिवाय देखील फिरताना आढळून येत आहेत. तर काही ठिकाणी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली जात आहे. कोरोनाच्या संकटात अत्यंत काळजी घेण्याचं आवाहन हे सरकारच्या वतीने केलं जात असताना लोकांचा हलगर्जीपणा पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकंच स्वत:हून नियमाचं पालन न करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत असल्याचं सध्या चित्र आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोक मास्क न लावताच रस्त्यावर मोठी गर्दी करत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा असलेल्या डोगरा चौक, परेड बाजार, राज तिलक रोड, गांधी नगर येथे लोकांची गर्दी होत आहे.
कोरोनाच्या संकटात लोकांचा हलगर्जीपणा ठरू शकतो घातक
लोकांच्या निष्काळजीपणामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अशावेळी लोकांनी सतर्क असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अधिकारी चंदन कोहली यांनी नाक्यावर पोलीस तैनात करण्यात आले असून कोरोना नियमावलीचं पालन करा असा संदेश लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सातत्याने देण्यात येत आहे. तर जे लोक नियमांचं उल्लंघन करत आहेत त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे असं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरच्या प्रशासनाने नागरिकांना कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा तरुणांच्या फुफ्फुसावर नेमका कसा होतोय परिणाम?; रिसर्चमधून मोठा खुलासा, तज्ज्ञ म्हणतात....
कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक वाईट परिणाम फुफ्फुसांवर होत असल्याचं याआधी समोर आलं आहे. मात्र आता करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात एक मोठा दावा करण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे तरुण व्यक्तींमध्ये फुफ्फुसांचे नुकसान होण्याचा धोका खूपच कमी असल्याचं म्हटलं आहे. कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. फुफ्फुसे पूर्वीप्रमाणे काम करतात, असा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून करण्यात आला आहे. मोगेंसेन यांनी कोरोनाग्रस्त असलेल्या तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असला तरी फुफ्फुसांच्या काम करण्याच्या क्षमतेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचं रिसर्चमध्ये स्पष्ट झालं असल्याचं म्हटलं आहे.