मुंबई - रामायण आणि महाभारत या मालिकांना नव्वदीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांची आठवण आली आहे. रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती आणि आता तर प्रेक्षकांना आजपासून रामायण ही त्यांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे.
रामायण मालिका आज सकाळी सुरु झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या घरात रामायण मालिका पाहात असल्याचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता. मात्र, नेटीझन्सने ट्विटरवरुन त्यांच्या या फोटोवर, देशातील सद्यपरिस्थीचा उहापोह केला. तसेच, केंद्रीयमंत्र्यांनी देशातील स्थितीकडे लक्ष द्यावे, कार्यालयीन बैठका घरात घ्याव्यात, रामायण काय पाहता, असे म्हणत जावडेकर यांना चांगलेच सुनावले. त्यानंतर, जावडेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील रामायण पाहतानाचा फोटो डिलिट केला आहे.
जावडेकर यांनी पहिला फोटो डिलीट करुन दुसरा फोटो अपलोड केला. त्यामध्ये आपल्या कार्यालयीन बैठका घरात घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच, सद्यपरिस्थितीत घरालाच कार्यालयाचं स्वरुप मिळालंय, लॉकडाऊन संदर्भात माझ्या खात्याशी संबंतीत अधिकारी आणि मंत्र्यांशी घरातूनत जोडलो गेलोय, असे दुसऱ्या ट्विटमध्ये जावडेकर यांनी म्हटलंय. जावडेकर यांच्या दुसऱ्या ट्विटलाही नेटीझन्सनने चांगलच फैलावर घेतलं आहे. पहिल्या ट्विटचा फोटो रिट्विट करत, आणि कमेंटमध्ये पहिल्या ट्विटचा फोटो दाखवत, हा फोटो का डिलीट केला? असा प्रश्न ट्टविटर युजर्संने जावडेकरांना विचारलाय.
महाभारत या मालिकेला इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. बी.आर.चोप्रा आणि रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत नितीश भारद्वाज, मुकेश खन्ना, गजेंद्र चौहान, प्रवीण कुमार, अर्जुन, पुनीत इस्सार, पंकज धीर, गुफी पेंटल आणि रुपा गांगुली यांच्या मुख्य भूमिका होत्या. आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना खऱ्या नावाने नव्हे तर या मालिकेतील व्यक्तिरेखांच्या नावानेच ओळखतात. कदाचित, त्यामुळेच जावडेकर यांनी रामायण पाहतानाचा फोटो ट्विटरवर अपलोड केला होता.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ८७९ वर गेली आहे. तर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळेच, भारताने कोरोनासंबंधी घेतलेल्या निर्णयाचं परदेशातूनही कौतुक होतंय.