बंगळुरू - देशातील कोरोनाची दुसरी लाट हळुहळू ओसरल्यानंतर आता दैनंदिन जीवन आता पूर्वपदावर येत आहे. देशातील विविध राज्यांमधील शाळाही आता बऱ्यापैकी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शैक्षणिक क्षेत्र रुळावर येत असतानाच कर्नाटकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयामधील ३२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी नववी ते बारावीमधील आहेत.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार यामधील सुमारे १० विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण ३२ विद्यार्थी-विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. शाळेचे प्राचार्य पंकजशन यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांवर जिल्ह्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरू होण्यास सुरुवात झाली असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.