बंगळुरू - कोरोनाच्या संकटामुळे पैशासाठी आणि पैशामागे धावणारा माणूस आज घरात बसून आहे. कोट्याधीश, अब्जाधीश असतानाही या महामारीचा सामना त्याला घरातच बसून करावा लागत आहे. घरात धान्य नसलेल्या गरिबांनाही अन् अब्जाधीश असलेल्या उद्योजकांनाही कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नाही. केवळ घरात राहणे आणि कोरोनाला दूर पळवणे हाच सर्वसाधारण इलाज या महारोगावर आहे. त्यामुळे, सर्वचजण आपल्या गावी, अन् घरात बसून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत आहेत. मात्र, गरिब आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. कित्येकांना दैनंदिन अन्नासाठी हात पसरावे लागत असून त्यांची उपासमार होत आहे. त्यातच, या संकटाने माणसाला माणूसपण चागंलच शिकवलंय. या गरजूंच्या मदतीसाठी कित्येक हात पुढे आले आहेत. कर्नाटकमध्ये दोन भावांनी चक्क आपली जमीन विकून गरिबांना मदत केलीय.
लॉकडाऊन सुरु होऊन आता १ महिन्याचा कालावधी उलटला असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, यापुढेही अजून सरकारचा काय निर्णय होईल, कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे, गरिब, मजूर आणि हाताव पोट असलेल्या नागरिकांमध्ये भीती अन् काळजीचं वातावरण आहे. हाताला काम नाही, घरात धान्य नाही मग खायचं काय अन् जगायचं कसं? हा मोठा प्रश्न या नागरिकांसमोर आ वासून उभा आहे. मात्र, सजाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटना पुढे येत असून अन्नदानाचे काम करत आहेत. गरिबांच्या घरी धान्य पोहोचविण्याचं काम सुरुय. कर्नाटकमधील दोन शेतकरी भावांनी चक्क आपली जमीनच विकली आहे. शहरात घेतलेला प्लॉट विकून गरिबांना मदतीचा हात या भावांनी दिला आहे.
कर्नाटकच्या कोलार शहरात तजामुल आणि मुजम्मिल पाशा या दोन भावांनी गरीबांना धान्य देण्यासाठी, त्यांच पोट भरण्यासाठी स्वत:च्या मालकिची जमीनच विकली आहे. भावा भावांनी जमीन विकून 25 लाख रुपये उभा केले. त्यानंतर एका नेटवर्कच्या मदतीने धान्य आणि भाज्या एकत्र केल्या. त्यानंतर धान्याची पाकिटं तयार केली. ज्यामध्ये दहा किलो तांदूळ, एक किलो आटा, 2 किलो गहू, 1 किलो साखर, तेल, चहापूड, सॅनिटायझर आणि मास्क अशा स्वरुपाचं किराणा कीट पुरविण्यात आलं. हे साहित्य वाटपासाठी त्यांनी घराजवळच एक तंबू उभारला आहे. तर, शेजारीत एक कम्युनिटी किचन सुरु केलंय. या किचनच्या माध्यमातून ज्यांना घरी अन्न शिजवणं शक्य नाही, अशांना पोटभर जेवण देण्यात येत आहे. आत्तापर्यंत २८०० कुटुंबातील १२ हजार लोकांनी यांनी मदत केली आहे.
हे दोन भावंड लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यावेळी, आजीसोबत ते कोलार येथे आले, आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने शिक्षणही घेता आले नाही. लहानपणी एका मुस्लीम व्यक्तीने मशिदीजवळ घर दिले, सर्वच धर्मीयांनी आम्हाला मदत केली. कुणीही आमची जात वा धर्म पाहिला नाही, त्यावेळी आम्हाला भाकरीची किंमत कळाली होती, म्हणून आम्हीही माणसूकी जपत आपल कर्तव्य बजावत असल्याचं तजामुलने म्हटले. या दोन भावांच्या दर्यादीलपणाची चर्चा सध्या कोलार शहरात आणि बंगळोरमध्ये होत आहे.