नवी दिल्ली - एकीकडे देशात कोरोनाच्या संसर्गामुळे बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. मात्र दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणूक आणि गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट असतानाच राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या या राजकारणावर अभिनेते प्रकाश राज यांनी बोचरी टीका केली आहे.
ट्विटरवरून केलेल्या या टीकेत प्रकाश राज म्हणतात की, प्रवासी पायी चालत जाऊ शकतात, मध्यमवर्ग शांतपणे मरू शकतो. अर्थव्यवस्था चौपट होऊ शकते, पण राजकीय पक्षांनी मात्र बिहारमध्ये आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. गुजरातमध्ये तर आमदारांना रिसॉर्टवर हलवण्यात आले आहे. ते जी गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतात ती ते करत आहेत.’’
या ट्विटमधून प्रकाश राज यांनी राज्यसभा निवडणुकीवरून गुजरातमध्ये सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली आहे. गुजरातमध्ये सध्या राज्यसभेच्या जागांसाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातून आमदारांना खबरदारीचा उपाय म्हणून रिसॉर्टवर हलवण्यात आले आहे. तर यावर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जेडीयू तसेच विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने आपल्या अनौपचारिक प्रचाराला सुरुवात केली आहे.
दरम्यान, प्रकाश राज यांचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही उमटत आहेत.इतर महत्त्वाच्या बातम्या