तिरुवनंपुरम : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाउन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री व्यतिरिक्त सर्व काही बंद आहे. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या तळीरामांची सध्या घालमेल सुरू आहे. तर काहींनी दारूसाठी स्वत:चा जीव द्यायलाही मागे-पुढे पाहिले नाही.
केरळमध्ये लॉकडाउनमुळे दारू मिळाली नाही म्हणून आत्महत्या केल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे केरळात ऑनलाइन दारू विक्री करण्याचा विचार येथील राज्य सरकार करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले की, "केरळमध्ये दारु विक्रीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील काही भागांत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सूचनेनुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की, अशा लोकांना दारू विक्री करण्यात येईल. तसेच, दारूची ऑनलाइन विक्री करण्याचा विचार सुद्धा करण्यात येत आहे."
दरम्यान, ज्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे, अशा लोकांना दारू विक्री करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पी. विजयन यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. गेल्या रविवारी कोडंगलूर परिसरात ३२ वर्षीय एका युवकाने आत्महत्या केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, दारू न मिळाल्याने त्रस्त होऊन नदीत उडी मारून आत्महत्या केली. तर अशाच प्रकारे येथील वल्लिकुन्नम येथे ३४ वर्षीय व्यक्तीने आफ्टर सेव्ह लोशन पिऊन आत्महत्या केली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केरळसह संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. केरळमध्येही दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे येथील राज्य सरकारडून कोरोनावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. आतापर्यंत केरळमध्ये २०० हून अधिक कोरोना बाधित रुग्ण असल्याचे समोर आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.