- योगेश बिडवई मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘केरळ पॅटर्न’ सर्व देशाला मार्गदर्शक ठरत असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विशेषत: वंचित घटकांना अन्न व औषधांची टंचाई निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केरळ सरकारने १० मार्चला बालवाड्या आणि शाळा बंद केल्या. त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाने माध्यान्ह भोजन योजनेत देण्यात येणारे शिजविलेले अन्न महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. ३३ हजार ११५ अंगणवाड्यांतील सुमारे ८ लाख ३० हजार बालकांना अन्नपुरवठा केला जात आहे. त्याची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. केरळने नवा आदर्श घालून दिला असल्याचे कौतुक सुप्रीम कोर्टाने केल्याचे केरळ राज्य योजना बोर्डाचे सदस्य डॉ. आर. राजकुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जननी योजना, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व तीन वर्षांपर्यंतची मुले यांच्यासाठीच्या जननी योजनेचा शिदा खंड न पाडता घरोघरी पोहोचविला जात आहे. लाभार्थ्यांना घरपोच योजनेचा लाभ मिळेल, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बालमृत्यू कमी करणे, बाळंतपणात माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे यासाठीच्या योजनांची कामेही कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सुरू आहेत.
राज्य सरकारकडून २० रुपयांत पौष्टिक थाळी उपलब्ध करून दिली जाते. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून १ हजार कॅन्टीनमधून ही थाळी गोरगरिबांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनाही आवश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत.
केरळ सरकारने २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. निवृत्तिवेतनधारकांना दोन महिन्यांचे निवृत्तिवेतन देण्यात येत आहे. निवृत्तिवेतनाचा लाभ न मिळणाऱ्यांना १,३२० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. अंत्योदय व गरीब कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे, असे केरळ राज्य योजना बोर्डाचे सदस्य डॉ. आर. राजकुमार यांनी सांगितले.
केरळमध्ये कोरोनाचे नवे ३९ रुग्ण; एकूण बाधितांचा आकडा १७६ वर
केरळमध्ये कोरोना विषाणूच संसर्ग झाल्याचे ३९ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले. यातील ३४ रुग्ण कासारगोडमध्ये, दोन कन्नूरमध्ये आणि थ्रिसूर, कोझीकोड व कोल्लाममध्ये प्रत्येकी एक मिळून तीन जण आढळले आहेत. त्यामुळे केरळमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७६ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, ५,६०७ अतिदक्षता बेड तयार ठेवण्यात आले आहेत. गरज भासल्यास ७१६ हॉस्टेल्समध्ये १५,३३३ खोल्या तयार ठेवण्यात आल्या आहेत.