तिरुवनंतपुरम : केरळमध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांपेक्षा या साथीतून बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. सारा देश ‘कोविड-१९’नामक भयंकर महामारीचा मुकाबला करत असताना, साथ नियंत्रणात कशी आणावी याचा आदर्श केरळने घालून दिला आहे. या राज्यात १४० रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २५७ झाली आहे.केरळमध्ये शनिवारपर्यंत कोरोना विषाणूमुळे संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३९९ झाली असून, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून, त्यानंतर तमिळनाडू व केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो. मात्र, महाराष्ट्रामध्ये रुग्णांची एकूण संख्या ३ हजारांपेक्षा जास्त तर तमिळनाडूमध्ये १ हजारपेक्षा जास्त इतकी आहे. केरळमध्ये मात्र बाधितांची संख्या या दोन राज्यांपेक्षा कमी आहे. कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णसंख्येबाबत केरळ देशामध्ये १४व्या क्रमांकावर आहे. (वृत्तसंस्था)मृत्यूदर अवघा ०.५ टक्केकेरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले की, आमच्या राज्यात कोरोना विषाणूच्या साथीमुळे मृत्यूदर ०.५ टक्के असून जगामध्ये हेच प्रमाण ५ टक्के इतके आहे. काही ठिकाणी हाच मृत्यूदर १० टक्क्यांहून अधिक आहे. रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षात ठेवलेल्या कोरोना रुग्णांपैकी बहुतांश लोकांची प्रकृती स्थिर आहे. फक्त काही रुग्णांचीच प्रकृती चिंताजनक आहे.केरळमध्ये आजारातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. असे असले तरी लॉकडाऊन शिथिल अथवा मागे घेण्याइतपत परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.- पिनाराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ
CoronaVirus: देशात भारी! 'या' राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 3:04 AM