रांची - बिहारमधील ज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावरही कोरोनाचं संकट असल्याचं समजतंय. सध्या ते रिम्समधील पेईंग वॉर्डमध्ये दाखल आहेत. लालूप्रसाद यांच्यावर डॉ. उमेश प्रसाद यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरु असून डॉ. उमेश स्वत: त्यांच्या प्रकृतीचा काळजी घेतात. मात्र, डॉ. उमेश यांच्या युनिटमधील एक रुग्ण गेल्या ३ आठवड्यांपासून कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यामुळे डॉ. उमेश प्रसाद यांच्या युनिटसह वैद्यकीय विभागातील २२ डॉक्टर, पीजी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या चाचणीसाठी आपले सँपल दिले आहेत.
डॉ. उमेश प्रसाद यांच्या संपर्कात असल्याने आता राजदप्रुख लालूप्रसाद यादव यांचेही सँपल तपासणीसाठी देण्यात येणार असल्याचे समजते. लालू प्रसाद यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात येईल, असे रिम्सचे संचालक डॉ. डीके. सिंह यांनी म्हटलंय. तसेच, आयसीएमआरच्या नियमावलीनुसार ज्या युनिटमध्ये लालूप्रसाद यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्या युनिटमधील डॉक्टरांचा तपासणी अहवाल आल्यानंतरच आणि या अहवालात कुणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला, तरच लालूप्रसाद यादव यांचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात येईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
जेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे, तेव्हापासून लालूप्रसाद यादव हे थेट संपर्कात येत नाहीत. दूरवरुनच दोन-तीन मिनिटांच्या कालवधीत डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस आणि देखभाल करतात. सध्या, युनिटमधील सर्वांचे सॅम्पल घेण्यात आले असून उद्यापर्यंत त्यांचा अहवाल येईल. त्यानंतरच, लालूप्रसाद यांच्या सँपल तपासणीबाबत विचार होईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने चारा घोटाळ्यात दोषी मानून शिक्षा सुनावली आहे. मात्र, अनेक आजारांमुळे त्यांच्यावर उपचार सुरु असून ते रुग्णालयात दाखल आहेत. क्रॉनिक किडनीच्या गंभीर आजारामुळेही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.