नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. यामध्ये अनेकांना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली आहेत. उपचारादरम्यान काही जणांचा मृत्यू झाला आहे. असं असताना एक सकारात्मक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षीय चिमुकल्याने मृत्यूवर मात केली आहे. कोरोनासह त्याने इतर संकटांवर मात करत यशस्वीरित्या लढाई जिंकली आहे. देशात मेडिकल सायन्सने इतिहास रचला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यावर मात करताना आरोग्याच्या इतर समस्या उद्भवतात. फुफ्फुसांवर मोठ्या प्रमाणात त्याचा वाईट परिणाम होतो.
अवघ्या 12 वर्षांचा मुलगा शौर्यला कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान त्याच्या फुफ्फुसांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. पण आता अनेक दिवसांनी फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवायच (Lung Transplant) त्याने हा लढा जिंकला आहे. भारतातीलच नव्हे तर आशियातील असं पहिलं प्रकरण आहे. शौर्य असं या मुलाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या शौर्यला चार महिन्यांआधी कोरोनाची लागण झाली होती. याच वेळी त्याच्या दोन्ही फुफ्फुसांवर याचा अत्यंत वाईट परिणाम झाला.
लाईफ सपोर्ट सिस्टमवरच 65 दिवसांनंतर तो झाला बरा
फुफ्फुसांला गंभीर इन्फेक्शन झाल्याने लखनऊतील डॉक्टरांनी त्याच्या पालकांना फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याचे आईवडील त्याला उपचारासाठी हैदराबादला घेऊन गेले. कोरोनामुळे त्याला मल्टी ऑर्गन इन्फेक्शन झालं होतं. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेजच्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. सुरुवातीला त्याला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर एक्स्ट्राकोरपोरील मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन म्हणजे ईसीएमओ लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. शौर्य 65 दिवस तो ईसीएमओवर होता. लाईफ सपोर्ट सिस्टमवरच 65 दिवसांनंतर तो बरा झाला. आता त्याला फुफ्फुस प्रत्यारोपणाची गरज पडणार नाही.
लवकरच शौर्यला डिस्चार्ज दिला जाणार
शौर्य हा आशियातील पहिला लहान मुलगा आहे, ज्याने इतके दिवस ईसीएमओवर राहून बरा झाला आहे. आता त्याची रुग्णालयात फिजियोथेरेपी सुरू आहे. डॉक्टरांच्या मते, लवकरच त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे. शौर्यची आई रेणू हिने मी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांचे मनापासून आभार मानते. मला त्यांनी फक्त माझा मुलगाच परत दिला नाही. तर माझं आयुष्य पुन्हा दिलं आहे. याआधी चेन्नईमध्ये देखील अशीच एक दुर्मिळ घटना घडली होती. कोरोना संसर्गामुळे तब्बल 109 दिवस ईसीएमओ (ECMO) प्रक्रिया आणि व्हेंटिलेटरवर राहावं लागलेले 56 वर्षांचे मुदिज्जा ठणठणीत होऊन घरी गेले होते. त्यांच्यावर फुप्फुस प्रत्यारोपणाची (Lung Transplant) शस्त्रक्रिया करावी लागली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.