नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील रुग्णसंख्येने गेल्या काही महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (6 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 4,12,262 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,10,77,410 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 23,01,68 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान कोरोना वॉरिअर्सनाच कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोरोनाने डॉक्टर्सचा बळी घेतला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association -IMA) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे यावर्षी 126 डॉक्टर्सचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी 734 डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला होता. मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे लसीकरण झाले होते का याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न इंडियन मेडिकल असोसिएशन करत आहे. डॉ. रवी वानखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या आरोग्य विभागाने कोरोना झालेल्या आणि त्यामुळे मृत्यू झालेल्या आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची स्थिती काय होती यासह माहिती नोंदवून ठेवणं आवश्यक आहे. दुर्दैवाने, सरकार तसे करत नाही म्हणून आयएमएही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे."
देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 16 कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले असून, 94.7 लाख आरोग्यसेवा कर्मचार्यांनी पहिला डोस घेतला आहे तर 63.5 लाख कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे. आयएमएने एक कोविड शहीद निधी देखील तयार केला असून, ज्यामधून आतापर्यंत मृत्यू झालेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना 1.6 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहितीही संघटनेनं दिली आहे. यामध्ये बिहारमधील डॉक्टरांची संख्या सर्वाधिक असून 49 डॉक्टरांचा बळी गेला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचं रौद्ररुप! "येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा होणार दुप्पट"; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. संशोधन सुरू असून त्यातून नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यांना येत्या काही दिवसांत कोरोना मृतांच्या आकडा दुप्पट होईल असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बंगळूरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने गणितीय मॉडेलच्या मदतीने भविष्यवाणी केली आहे की, देशात रुग्णांचा संख्या जर अशीच वाढत राहीली तर 11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद केली जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही आठवड्यात ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या ही सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट असू शकते असं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
सध्या कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. टेस्टिंग लवकर करणे हे खरंच आव्हानात्मक आहे. मात्र याच दरम्यान बिहारमधील IIIT च्या विद्यार्थ्यांनी कमाल केली आहे. अनोखं सॉफ्टवेअर तयार केलं आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोरोना आहे की नाही, हे अवघ्या दोन मिनिटांत समजणार आहे. या सॉफ्टवेयरच्या मदतीने रुग्णांच्या छातीचा एक्सरे काढला जातो. त्यानंतर सिटी स्कॅन केलं जातं. एक्स रे आणि सिटी स्कॅन हे दोन्ही रिपोर्ट पाहून अवघ्या काही सेकंदात एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याची माहिती मिळते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फक्त कोरोना नव्हे तर टीबी, व्हायरल आणि बॅक्टेरियल निमोनिया सह सामान्य रुग्णांचा एक्सरे प्लेटवरून माहिती मिळते. या अविष्कारला मान्यता देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ICMR ने यासाठी सल्लागार समितीची स्थापना केली आहे. पटणा एम्समध्ये या सॉफ्टवेयरची टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे.