नवी दिल्ली - पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या एका विमानातील 125 प्रवासी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. या विमानात एकूण 179 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्रवाशांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इटलीहून देशात आलेल्या या प्रवाशांपैकी 13 कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी रुग्णालयातून पळून गेले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व लोकांनी आरोग्य अधिकाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला आहे.
भारतात आलेल्या सर्व कोरोनाबाधित प्रवाशांना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 13 कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची लागण झालेल्या प्रवाशांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना फसवून तिथून पळ काढल्याचं आता निश्चित झालं आहे. पळून गेलेल्या सर्वांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. अमृतसरचे डिप्युटी कमिश्नर गुरप्रीत सिंह खेड़ा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पळून गेलेले प्रवासी परत आले नाहीत, तर त्यांचे फोटो वर्तमानपत्रात छापले जातील आणि त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल.
"प्रवाशांचा असा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही"
"आम्ही आमच्या राज्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, अशा परिस्थितीत प्रवाशांचा असा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,17,100 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 302 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,83,178 लोकांना जीव गमवावा लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. राजधानीत आधीपासून अस्तित्वात असलेल्या कोरोना डेल्टा व्हेरिएंटसह, ओमायक्रॉन व्हेरिएंट देखील पसरत आहे.
'डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर होताहेत बरे'
कोरोनाच्या संकटात आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर बरे होत आहेत. ओमायक्रॉन हा सौम्य आहे आणि डेल्टाच्या तुलनेत त्याची लागण झालेल्या रुग्णांना कमी वेळात डिस्चार्ज दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 185 रुग्ण आले आहेत. त्यापैकी 150 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. रुग्णांपैकी बहुतेक जणांना फक्त सौम्य लक्षणे आहेत आणि 5 ते 7 दिवसांनी डिस्चार्ज मिळत आहे. तर डेल्टाच्या काळात 14 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत असे. अशा रूग्णांवर ओमायक्रॉन डेडिकेटेड हॉस्पिटल असलेल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये देखील उपचार केले जातात. रुग्णालयाचे संचालक डॉ. सीएल गुप्ता यांनी आतापर्यंत 30 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. बहुतेक रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि प्रोटोकॉलनुसार निगेटिव्ह चाचणी घेतल्यानंतर आठव्या दिवशी त्यांना सोडण्यात येत आहे. रुग्ण लवकर बरे होत आहेत.